Tuesday 4 July 2023

 बालसंस्कार




घरात बाळ जन्माला आलं, की सर्वांनाच आनंद होतो; पण त्यानंतर जन्मदात्यांची जबाबदारी वाढते. त्याला सुशिक्षित, सुसंस्कारित करण्यासाठी आणि पुढं त्यानं परिवाराचा नावलौकिक वाढवावा यासाठीच ही धडपड असते. बाळाला जन्म देत मातृपितृ ऋणातून मुक्त झाल्याचा आनंद एकीकडे आणि बाळाला सुसंस्कारी करण्याची जबाबदारी दुसरीकडे, अशा दुहेरी भूमिकेत ते असतात. बाळावर संस्कार करण्याचा क्रम ठरलेला असतो. जन्मापासून पाच वर्षांपर्यंत प्रेमानं पालन-पोषण करणं आवश्यक असतं. या काळात त्याला पाप-पुण्य, सहकार-असहकार, राग-द्वेष, चांगलं-वाईट यांतील काहीही कळत नसतं. पाहायला आणि ऐकायला असणाऱ्या अप्रिय गोष्टी बाळासमोर करू नये. बाळाला रागवणं आणि लाड करण्याची वेळ ठरलेली आहे. पाच वर्षं लाडात, प्रेमात वाढवणं, त्याला प्रेमाची असलेली अपेक्षा पूर्ण करणं महत्त्वाचं.

वयाच्या पाच ते पंधरा वर्षांपर्यंत प्रेमाबरोबर अनुशासन महत्त्वाचं आहे. सहाव्या वर्षापासून प्रेमाबरोबर थोडं कडकपणे वागवावं. नियोजन, शिस्त आणि संयमाचा उत्तम पाठ आहे. नात्याबरोबरच समाजातील चांगलं-वाईट, ज्ञान-अज्ञान, फायदा-तोटा, धर्म-अधर्म, कर्तव्य, जबाबदारी, जग, निसर्ग, परिवार, समाज यांच्याशी नातं या सर्वांची या वयात ओळख करून द्यावी. शाळेत जे मिळणार नाही, ते पालकांकडून मिळत असतं. ते देण्याची जबाबदारी त्यांची आहे. निसर्ग नावाच्या विद्यापीठात बऱ्याच विद्या असतात. प्रत्येक इंद्रियाचा व्यवहार शिकवावा लागतो. सोळाव्या वर्षानंतर त्याला मित्रासारखं वागवावं. मित्राप्रमाणे सल्ला द्यावा. संस्कारांच्या मुशीत तयार करावं. अनेकदा त्याला हित-अहित माहीत नसतं; त्यामुळे त्याला विश्वासानं, श्रद्धेनं माहीत करून द्यावं. तो वाईट संगतीला लागू नये, वाया जावू नये याची काळजी घेणं हे प्रत्येक पालकाचं कर्तव्य आहे, यासाठी जे जे आदर्श आहे, ते ते त्याच्या समोर ठेवावं. बाळ ही पारिवाराची संपत्ती आहे, परिवाराचा बोजा होऊ नये, एवढी काळजी घ्यायलाच हवी.




एका गुन्हेगारास मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली जाते. त्याला जेलर शेवटची इच्छा विचारतो; तेव्हा आईला भेटण्याची इच्छा असल्याचं तो सांगतो. आई समोर आल्यानंतर, आजच्या स्थितीला तीच जबाबदार असल्याचा आरोप तो करतो. पहिल्या चोरीच्या वेळी तू अडवलं असतंस, तर भविष्यात मोठा गुन्हेगार झालो नसतो, असा ठपका तो तिच्यावर ठेवतो. यावरून एक गोष्ट सिद्ध होते, ती म्हणजे मुलांवर योग्य वेळी योग्य संस्कार करण्याची जबाबदारी आपलीच आहे.

No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...