अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी
पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांपेक्षा देवाने मनुष्याला बहुतांशी जादा गोष्टी दिल्या. वाचा दिली, बुद्धी दिली; त्यामुळे सारे आनंदी, सुखात राहतील अशी अपेक्षा होती.
पशू, पक्षी, प्राणी, वनस्पती या सर्वांपेक्षा देवाने मनुष्याला बहुतांशी जादा गोष्टी दिल्या. वाचा दिली, बुद्धी दिली; त्यामुळे सारे आनंदी, सुखात राहतील अशी अपेक्षा होती. तसे मात्र सर्वत्र दिसत नाही. माणूस स्वत:कडील गोष्टींचे मोल न जाणता इतरांशी तुलना करतो. पूर्वी पोटभर अन्न, वस्त्र आणि निवारा एवढीच अपेक्षा असायची. आता अपेक्षा रोज वाढत आहेत. गरजा आणि अपेक्षा यांचा ताळमेळच बसत नसल्याने, सारे काही असूनही निराशेच्या गर्तेत जावे लागते. हे टाळून आनंदात राहायचे असेल, तर गरजा व अपेक्षांचा मेळ घालायला हवा.
पशू-पक्षी किती आनंदी असतात पाहा. पोटभर खायला मिळाले, की त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहा. आपले तसे नाही. कितीही मिळाले, तरी अजून अधिक मिळविण्याची आपली हाव असते. जाताना काही घेऊन जायचे नाही, हे माहीत असूनही आणखी मिळविण्याची हाव. यामुळे अमाप संपत्ती, सोयी,-सुविधा असूनही गरज आणि अपेक्षा यांत ताळमेळ नसल्याने, अनेक जण सुखाच्या शोधातच फिरतात. समाधान असेल, तरच पैसा सुख देतो.
अनेकदा आपल्याकडे काय आहे यापेक्षा काय नाही, यावरच चर्चा अधिक असते. शेजाऱ्यांकडे काय नाही, यापेक्षा काय आहे यावर लक्ष; त्यामुळे जे आपल्याकडे नाही, त्याचे दु:ख अधिक. अशा विचारांनी मानसिक स्वास्थ्य जाते. स्वत:कडील गोष्टींची किंमत कळत नाही. अपेक्षा करीत वेळ वाया जातो. अशा वेळी इतरांच्या गोष्टी पाहून दु:खी होण्यापेक्षा, आपल्याला त्याची गरज आहे का, हे पाहायला हवे. तसा प्रश्नच आपल्या मनाला विचारायला हवा. असा प्रश्न विचारला, तर अनेकदा त्याची काही गरज नसल्याचे उत्तर आपले मन देईल; कारण शेजाऱ्यांनी घर सजवले, म्हणून आपले लगेच सजवायलाच हवे का? भावकीत कुणी काही खरेदी केली, तर लगेच आपणही ते घ्यायलाच हवे, असे नाही. त्यांनी केले, म्हणून मी केलेच पाहिजे, ही भावना कधीच सुखी करणारी नसते.
बऱ्याच वेळा आपण आवश्यकता नसताना अपेक्षा करतो. क्षमता आणि ऐपत नसताना बऱ्याच वस्तूंची खरेदी करतो. समाज काय म्हणेल, या भीतीने काही गोष्टी डामडौलाने करून विनाकारण कर्जबाजारी होतो. आपण कुणाशी तरी सतत तुलना करीत राहिलो, तर कधीच आनंदी जीवन जगू शकणार नाही; त्यामुळे तुलना करताना आपल्यापेक्षा मोठ्या नव्हे, तर छोट्यांबरोबर केल्यास नक्कीच आनंदी व्हाल आणि आनंदी राहाल. हे करताना अंथरूण पाहून पाय पसरण्यापेक्षा, अंथरूणच पसरण्याचा प्रयत्न करायला काहीच हरकत नाही.
No comments:
Post a Comment