Tuesday 4 July 2023

आनंदाचा क्षण! - सिद्धगिरी दैनंदिनीतून

 

आनंदाचा क्षण!



अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी
आनंद हा शब्द सर्वांना परिचित आहे. त्याच्या प्राप्तीसाठी रात्रंदिवस सर्वांचे प्रयत्न सुरू असतात; पण तो प्रत्येकाला मिळतो असे नाही. अनेकदा त्याचा अर्थच माहीत नसल्याने, तो मिळविण्यासाठी विनाकारण धडपड सुरू असते. अशा वेळी 'काखेत कळसा, गावाला वळसा' अशी स्थिती होते. आनंद म्हणजे सुख आणि दु:ख या पलीकडे असणारी गोष्ट आहे. सुख म्हणजे अनुकूल आणि दु:ख म्हणजे प्रतिकूल वेदना. इष्ट वस्तूची प्राप्ती म्हणजे सुख आणि अनिष्ट विषयाची प्राप्ती म्हणजे दु:ख. प्रिय गोष्टींचा संयोग म्हणजे सुख आणि अप्रिय गोष्टींचा संयोग म्हणजे दु:ख. या गोष्टी कधीच चिरंतन नसतात. त्यांची ये-जा सुरू असते आणि हे स्वाभाविक आहे.

मान आणि मरण या गोष्टी गेल्यानंतर परत येत नाहीत; त्यामुळे त्यांना सांभाळायचे आहे. सुख आणि दु:ख, आनंद आणि किर्ती येतात-जातात. फक्त ते आपण जाणून घ्यावे लागते. कीर्ती आणि आनंद आपल्या मानण्यावर आहे, म्हणून ते सुख-दु:खाच्या पलीकडे आहे. आनंद हा विषयावर अवलंबून राहत नाही; तो आपल्या मनाच्या मानण्यावर असतो. खूप कमावले आणि मनानेच ते मान्य केले नाही, तर तो आनंद नव्हे. आनंद आपल्या अंतरंगात आहे; परंतु आपण त्याला शब्द, स्पर्श, गंध, रस अशांत शोधत असतो. मुळात मानले, तर प्रत्येक विषयात आनंद आहे; न मानल्यास कशातही नाही.

आनंद हा अपरिमित संतोष आहे. त्याला देश, काल, वस्तूंची सीमा नाही. त्याच्या शोधासाठी खूप जण प्रयत्न करीत असतात. हे करताना कधी कधी ध्येय विसरतात. आनंद मिळवण्यासाठी कोट्यवधींचा प्रवास सुरू असतो; पण त्याच्या पत्त्यावर पोहोचतात शेकडोच! ध्येय विसरून वाटचाल करणारा कधीच यशस्वी होत नाही आणि आनंदीही. एकदा एका गल्लीत चोर चोरी करीत होता. शेजाऱ्यांना त्याची कुणकुण लागली. शेजारी उठल्याने चोर पळू लागला. त्याला पकडण्यासाठी चांगला धावपटू असलेला युवक पाठलाग करू लागला. पुढे चोर, मागे हा धावपटू. दोघांची जणू शर्यतच. पाठलाग करता करता धावपटू ध्येयच विसरून गेला. चोराला पकडायचे सोडून, त्याला मागे टाकून, तो पहिला क्रमांक मिळविण्यासाठी पुढे पोहोचला. यामुळे चोर निसटला. अनेकांचे आयुष्य असे ध्येयहीन आणि दिशाहीन झाले आहे. ध्येयाने वाटचाल करीत, नव्या इच्छा आकांक्षांना कवेत घेण्याचा प्रयत्न केल्यास जगात सर्वांत आनंदी आपणच असणार आहोत. मनाला भूत आणि भविष्याकडे धावण्यापासून थांबवत, प्रत्येक विषयात आनंद मानण्याइतके त्याला परिपक्व, मजबूत केल्यास, सर्वांत आनंदी आपणच असणार आहोत.

No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...