Tuesday 4 July 2023

मान-सन्मान 

अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी

राजा असो की प्रजा, गरीब असो की श्रीमंत, लहान असो की मोठा, प्रत्येकाला स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे. जगात वावरताना प्रत्येकाला वाटते, की आपला सन्मान व्हावा, मान मिळावा. यात काहीच गैर नाही; पण सत्काराचे, कौतुकाचे हार स्वीकारताना आपली समाजाप्रती काही कर्तव्ये असतात. सुजाण नागरिक म्हणून काही जबाबदारी असते. या जगात मान दिला, तर सन्मान नक्की मिळतो. अहंकार, मीपणा बाजूला ठेवून एकमेकांचा सन्मान केला, तर आपण सारेच सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगू शकतो.

'जगा आणि जगू द्या'या तत्त्वाप्रमाणे, 'एकमेकांचा मान-सन्मान ठेवा, माणसांचा आदर करा' हे साधे सूत्र पाळल्यास कुणी आपल्याकडे बोट दाखविणार नाहीत. मुळात आपल्याला कुणी वाईट म्हणू नये, असे वर्तन करण्याची जबाबदारी आपलीच आहे. इतरांना मान दिला म्हणून आपला मान कमी होतो, किंवा पैसे जातात, आर्थिक नुकसान होते असे काही आहे का? मग एकमेकांचा सन्मान करायला आपण कमी का पडायचे? आत्मसन्मान हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो टिकविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. सन्मानाने जगताना दुसऱ्यांच्या भावना दुखावण्यात वेळ घालवू नये. परस्परांमध्ये द्वेष, मत्सर, ईर्ष्या, वैर, कपट हे सारे विसरण्याची गरज आहे.

जगज्जेता सिकंदरने पराभूत झालेल्या राजा पोरसला विचारले, 'तुमची इच्छा काय आहे?' त्यावर तो म्हणाला, 'मला राजाप्रमाणे वागव.' हे ऐकून सिकंदर जिंकलेले राज्य परत त्याला परत देऊन गेला. यात आत्मसन्मान आणि दुसऱ्याप्रती सन्मान या दोन्हींचे दर्शन घडते. सन्मानाने जगण्यासाठी काय लागते? अन्न, वस्त्र आणि निवारा मिळाला की झाले. जादा हव्यासापोटी अनेकदा काही जण लाचार होतात. जीवनात इज्जत मोलाची. ती एकदा गेली, की परत मिळत नाही आणि जगाच्या बाजारात विकतही मिळत नाही. अनेकदा घरातील व्यक्तींना मोठे म्हणण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवत नाही. खिशात चार पैसे आल्यावर अनेकांची चाल बदलते. हल्ली श्रीमंती पाहून मान देण्याची प्रथा आहे; पण त्यापेक्षा ज्ञानी, समाजसुधारक, साधू, संतांना अधिक मान मिळायला हवा. एकमेकांचा सन्मान केल्यास मैत्री नुसती टिकत नाही, तर बहरते. कोणत्याही नात्यात हे सूत्र लागू पडते. एकमेकांच्या धर्माचा, भावनांचा, मतांचा, संस्कृतीचा सन्मान व्हावा. दुसऱ्यांचा आदर करण्याची, सन्मान ठेवण्याची सुरुवात घरात करावी. 'सन्मान द्या आणि मान घ्या' या तत्त्वानुसार वागल्यास कुणाच्याही आत्मसन्मानाला धक्का लागणार नाही.


No comments:

Post a Comment

त्यागातच खरे सुख ! - सिद्धगिरी दैनंदिनी

त्यागातच खरे सुख ! अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज   'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार ...