त्यागातच खरे सुख !
अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज
'त्यागेन एकेन अमृतत्व मानषु:, न धनेन, न दानेन, न प्रजया' असा एक विचार आहे. यानुसार खरे सुख भोगात नाही, तर त्यागात आहे. त्यागाने मनाला सुख, शांती मिळते, म्हणून ते सर्वश्रेष्ठ आहे. जगात त्यागवादी व्यक्ती पूजनीय असतात, भोगवादी नव्हे. यावरून आपण यातील काय व्हावे, हे प्रत्येकाने ठरवायला हवे. जगात दोन प्रकारची जीवनप्रणाली आहे. सुख मिळविण्याचे दोन प्रकार आहेत. एक भोगाने आणि दुसरे त्यागाने. त्याग आणि भोग दोन्ही शब्द सापेक्ष आहेत. भोगाने सुख मिळते, असे समजून काही जण कोणत्याही स्तराला जाण्यास तयार असतात. मुळात भोग हा एकेंद्रिय नाही. तो सर्व इंद्रियांचा विषय आहे. कानाचा भोग आहे शब्द, डोळ्यांचा रूप, नाकाचा गंध, जिभेचा स्वाद आणि त्वचेचा भोग स्पर्श आहे. यासाठी काही जण वाटेल ते करायला तयार असतात. इतिहासातील अनेक घटना याचा साक्ष आहेत.
भोगासाठीच इतिहासात हजारो लढाया झाल्या. अनेकांनी कोर्ट-कचेरी केली. काही देशांत अराजकता निर्माण झाली. भोगवादी अनेकदा इतरांचा सर्वनाश करतात. काही वेळा तर स्वत:चाही. भूतलावरील जीवसृष्टीचा येथील प्रत्येक गोष्टीवर समान अधिकार आहे; तथापि माणसांच्या कर्माने दोन लाख प्रजातींचा नाश झाला. जे आहे, ते सर्व माझेच आहे, या स्वार्थी आणि भोगवादी वृत्तीने मानव केवळ शोषण करीत आहे.
भोगाने ना समाधान मिळते ना तृप्ती. अग्नीत तूप टाकले, की ती शांत होत नाही; अधिक भडकते. असेच भोगाचे आहे; त्यामुळे रोज पोट भरण्यासाठी दोन भाकरी लागत असताना, दोन कोटी रुपये दिले तरी समाधान वाटत नाही. अजून मिळेल का, याच आशेवर माणूस राहतो. त्यासाठी धडपडतो. मानवाच्या सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण करण्याची क्षमता निसर्गात आहे. दुराशा पुरविण्याचे सामर्थ्य मात्र नाही. 'भोगवादाने माझा विकास झाला,' असे कुणी म्हणत असेल, तर तो आभास आहे. सुखाने जगायचे असेल, तर वास्तवाचे भान हवे. निसर्गातील सर्व जीव एकमेकांसाठी काही ना काही त्याग करूनच नैसर्गिक संतुलन राखतात. माणूस हा एकमेव जीव त्याग कमी आणि भोग अधिक घेतो. यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. यापुढे हा समतोल राखायचा असेल, तर त्यागाची वृत्ती वाढायला हवी. ती ज्याच्याकडे असते, तेच पूजनीय ठरतात. महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्यासारख्या अनेकांनी त्याग केला, म्हणून ते पूजनीय ठरले. जगात श्रीमंती विकत घेता येते, पूजनीयता नाही; एवढे लक्षात ठेवले, तरी भोगवादी दुनिया त्यागवादी होईल.